अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरुवार रात्री वादळी वाऱ्यामुळे माणकापूर येथील प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज युवा नेते उत्तम पाटील यांनी तातडीने शाळेस भेट देऊन पाहणी केली. शाळेच्या इमारतीची झालेली हानी, उडालेली छप्परं, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण झालेली परिस्थिती याची माहिती घेतली.
झालेल्या नुकसानी बाबत माहिती घेतली त्यांनी लागलीच विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजी व क्षेत्र शिक्षण अधिकारी महादेवी नाईक यांना याबाबतची माहिती दिली व या ठिकाणी त्वरित सोय करावी अशी मागणी केली.
उत्तम पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्यात यावी.शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे मागणी करण्यात आली आहे.स्थानिक नागरिकांनीही या वेळी आपली व्यथा मांडत लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून आपण याबाबत विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनाही माहिती दिली आहे.
वादळाच्या तडाख्यात शाळेच्या इमारतीचे छप्पर उडून गेले असून काही वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. खिडक्या व दरवाजेही मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले आहेत. सुदैवाने ही घटना सुट्टीच्या वेळेत घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.गावकऱ्यांनीही प्रशासनाकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य , शिक्षक पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
