शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
जलजीवन मिशन अंतर्गत मौजे शिवणाकवाडी (ता. शिरोळ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस अंदाजे २ कोटी ७१ लाख ८६ हजार ९८४ रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या योजनेस मान्यता मिळवून देण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, सांगली यांच्या माध्यमातून ही मान्यता देण्यात आली असून, जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेस सुमारे २ कोटी ७२ लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर विविध टप्प्यांवर पडताळणी, निरीक्षण व तांत्रिक बदलांच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी वेळोवेळी पूर्तता अहवाल सादर करून सुधारित प्रस्ताव मांडला. अखेर सर्व तांत्रिक बाबींची छाननी पूर्ण झाल्यानंतर सुधारित अंदाजपत्रकास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेमुळे शिवनाकवाडी गावातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होणार असून, दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत आमदार यड्रावकर यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून पाठपुरावा केला. त्यामुळेच ही महत्त्वाची योजना मार्गी लागली जात आहे.
