हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री कल्लेश्वर श्रावण मास उत्सव समिती आणि श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट ,कुरुंदवाड यांच्या वतीने श्री कल्लेश्वर मंदिर कुरुंदवाड येथे आज 'बदलती जीवनशैली व आरोग्य' या विषयावर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. कुमार पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत, प्रास्ताविक व परिचय आकाशवाणी पुणे येथील सहाय्यक संचालक(राजभाषा )व सुप्रसिद्ध कवी श्री. सच्चिदानंद आवटी यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. उमेश लंबे होते. यावेळी बोलताना डॉ. कुमार पाटील यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या राहणीमानाच्या चुकीच्या सवयी, आर्थिक स्थैर्य, नैतिकता या गोष्टी ढासळत असून त्यामुळे आरोग्यासोबतच सुविचार ,सदाचार सुसंगती तसेच सद्गुरूंचा आशीर्वाद या सुसंस्कारासाठी आवश्यक गोष्टींचा ऱ्हास होत आहे; हे कुठेतरी थांबलं पाहिजे तरच आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले होईल असे विचार व्यक्त करून श्रावण मास व्याख्यानमाला सुरू केल्याबद्दल कल्लेश्वर श्रावण मास उत्सव समिती व वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट कुरुंदवाडला धन्यवाद दिले. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर डॉ.उमेश लंबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ट्रस्टचे सचिव सुरेश आवटी यांनी तर सत्कार रामचंद्र आंबी यांनी केला.तर डॉ.उमेश लंबे यांचे स्वागत कुमार महामुनी यांनी केले. यावेळी डॉ.प्रशांत अंदरघिसके,शिवमुर्ती स्वामी,शशिकांत पाटील,दुंडय्या स्वामी,अनिल पाटील, प्रा.मनोहर कोरे, अनिल माळी,मल्लु मिरजे, सौ.सारिका आवटी,सौ.शोभा परीट आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या श्रावण रविवारी,ॲड.राघवेंद्र गोरवाडे यांचे 'संस्कार आणि संस्कृती ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले असून या व्याख्यानाचा देखील लाभ घेण्याचे आवाहन करुन आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रम संपन्न झाला.
