कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महापूराच्या विळख्यात सापडलेल्या व बेटाचे स्वरूप प्राप्त झालेल्या कुरुंदवाड शहरातील जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. यामध्ये कुरुंदवाड नगरीतील शाळांनाही महापूराचा फटका बसला होता.सुरक्षिततेसाठी विद्यार्थी पालकांच्या समवेत परगावी व छावणीमध्ये आश्रयासाठी गेले होते.कुमार विद्या मंदिर नं.३ या शाळेतील वर्गखोल्यांमध्येही पाणी आले होते.सीताबाई पटवर्धन हायस्कूल व फडणीस प्राथमिक विद्या मंदिर या ठिकाणी पूरग्रस्त छावणी आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन सर्व शाळा अतिवृष्टी व महापुरामुळे बंद ठेवण्यात आल्या होत्या.
अद्यापही शिवतीर्थ जवळील मार्गावर पाणी वाहत आहे.एस.टी.वाहतूकही बंदच आहे.हळूहळू संथगतीने उतरत असलेल्या पाण्यामुळे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आज सोमवार दि. ५ ऑगस्ट २०२४ पासून एस.पी. हायस्कूल व फडणीस प्राथमिक विद्या मंदिर वगळता शहरातील सर्व शाळा सुरु करण्यात आल्या.शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली होती.आज उत्साहवर्धक वातावरणात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली.
