Top News

शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर २२ कोटी ६० लाख रुपये जमा

 आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती ; राज्य सरकारचे मानले आभार 

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून शिरोळ तालुक्यातील मंजूर झालेल्या ७५ हजार ३३२ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी ३ हजार असे २२ कोटी ६० लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ तालुक्यातील बहुतांशी महिलांना झाला असून शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याचे समाधान महिला वर्गातून व्यक्त होत असून महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या लाडकी बहिण योजना राबविण्यात शिरोळ तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून पहिल्या टप्प्यात शिरोळ तालुक्यातील ७५ हजार ३३२ महिला लाभार्थी पात्र झाले आहेत. यासाठी शिरोळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, महाई सेवा केंद्र आणि प्रशासनाचे युद्धपातळीवर काम करून प्रकरणे मंजूर केली आहेत. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यादृष्टीने बऱ्यापैकी या योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यात आली आहे. 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला हप्ता जमा झाल्याने राज्यातील महिलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राज्य सरकाराबद्दल महिला वर्ग कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

आजपर्यंत पात्र महिला लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ३ हजार असे २२ कोटी ६० लाख रुपये खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबरोबर वयोश्री योजना, युवक - युवतींना प्रशिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी राज्य सरकार कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने