आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला शिरोळ तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून आज अखेर शिरोळ तालुक्यात ७५ हजार २१४ प्रकरणांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून योजनेचा लाभ घेणारा शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून यासाठी तालुक्यातील प्रशासन महा-ई-सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका त्यांचे मोलाचे योगदान लाभले असून यापुढेही या सर्वानी लाडकी बहीण योजनेत तालुका अग्रभागी ठेवावा, असे प्रतिपादन शिरोळ तालुका लाडकी बहिण योजना समितीचे अध्यक्ष, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ येथील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिरोळ तालुका समितीची बैठक आज संपन्न झाली. प्रारंभी मनीषा पालकर यांनी या योजने संदर्भात माहिती दिली. यावेळी आलेल्या सर्व अर्जांना मंजूरी देण्यात आली.
लाडकी बहीण योजनेमध्ये परिश्रम घेतलेले प्रशासन अधिकारी, कर्मचारी, महा-ई-सेवा केंद्र चालकांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बऱ्यापैकी या योजनेतील जाचक अटी शिथिल करून या योजनेची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली असल्याने तालुक्यातील पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. योजना राबवीत असताना शिरोळ तालुक्यात पहिल्या टप्प्यात ७५ हजार २१४ अर्ज मंजूर करून शिरोळ तालुका ही योजना राबवण्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. सदर योजनेची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याने पात्र सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी प्रशासनाने देखील युद्धपातळीवर काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य अमरसिंह माने पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, कुरुंदवाड नगरपालिकेचे प्रतिनिधी सुरेश कांबळे, जयसिंगपूर नगरपालिकेचे प्रतिनिधी शितल कांजर, बाल विकास प्रकल्प २ चे अधिकारी अमोल पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना राबविण्यात जिल्ह्यात तालुका प्रथम क्रमांकावर
शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात शिरोळ तालुका नेहमीच कोल्हापूर जिल्हात अग्रभागी राहिला आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा, परितक्त्या यासह संजय गांधी पेन्शन योजना राबविण्यात शिरोळ तालुका प्रथम क्रमांकावर राहिला आहे. इतकेच नव्हे तर नुकत्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा शिरोळ तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला असल्याने आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शासनाच्या सर्वच योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे यावरून दिसून येते.
