उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते धनादेश प्रदान
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
अकिवाट येथे ग्रामपंचायतीची मोटार सुरू करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर - ट्रॉली उलटून झालेल्या दुर्घटनेत सुहास पाटील व अण्णासाहेब हसुरे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विकास सेवा सोसायटी सभासद विमा म्हणून २ लाख असे एकूण ६ लाखांचा धनादेश मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.
अकिवाट येथे गेल्या आठ दिवसापूर्वी महापूर काळात गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बस्तवाड मार्ग अलगत असलेली मोटार चालू करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर - ट्रॉली उलटून आठ जण पाण्याच्या प्रवाहात पडले होते. यापैकी ५ जन सुखरूप बचावले मात्र, सुहास पाटील व अण्णासाहेब हसुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार ते अद्यापही बेपत्ता आहेत. दरम्यान, या मृत कुटुंबीयांना शासनाच्या वतीने तातडीने प्रत्येकी ४ लाखांची मदत करण्यात आली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासद विमा उतरविला होता या विम्यातून प्रत्येकी २ लाख असे मिळून ६ लाखांचा धनादेश मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
