शिरोळ तालुक्यात मतदान यंत्रणा सज्ज उद्या मतदान साहित्याचे होणार वाटप
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे उद्या सोमवारी सकाळी मध्यवर्ती प्रशासक इमारतीमधील आवारातून मतदानाचे साहित्य वाटप करून मतदान कर्मचारी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान आपापल्या मतदान केंद्रावर ती रवाना होणार आहेत प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ते कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून देशातील सर्वोच्च अशा लोकोत्सवात सहभाग घ्यावा असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहनी चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी होणाऱ्या मतदान प्रक्रिया करिता शिरोळ तालुक्यात २९६ मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी १७५८ अधिकारी व कर्मचारी तसेच ३६ झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिरोळ तहसील कार्यालयात सीयु - ४१५, बीयु - ७१५ व व्हीई पॅड ३९९ इतके मशीन दाखल झाले असून ते सीलबंद अवस्थेत पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. एकूणच तालुक्यात १ लाख ५८ हजार १५८ पुरुष मतदार तर १ लाख ५८ हजार ६२८ महिला मतदार असे मिळून ३ लाख १७ हजार ४९० मतदार दिनांक ७ मे २०२४रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला हक्क बजावणार आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये ५४ गावांचा समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून आंध्रप्रदेश राज्यातील ९६ पोलिसांचे पथक शिरोळ मध्ये दाखल झाले आहेत. याचबरोबर २९३ मतदान केंद्रासाठी १७५८ अधिकारी व कर्मचारी तसेच ३६ झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. उद्या सोमवार दिनांक६ मे रोजी सकाळी नऊ वाजता मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे मतदान केंद्र स्थळी जाण्यासाठी ५४ बसेस, २ कार्गो व ५७ जीप अशा एकुण ११३ वाहनांची सोय करण्यात आली आहे. मतदान साहित्याचे वाटप करण्यासाठी प्रशासकाई इमारतीच्या आवारात शामियाना उभारण्यात आला आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर शासनाच्या नियमानुसार विविध सेवा सुविधाही पुरवण्यात आले आहेत निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सध्या टपाली मतदानाची नोंद घेण्याचे काम तहसील कार्यालयात सुरू आहे. त्याचबरोबर ८५ वर्षाच्या पुढील १५३ अपंग तसेच वृद्ध मतदारांपैकी या १३१ जणांनी गृह मतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजावला आहे. यातील १४ वृद्ध व अपंग व्यक्ती गृह मतदान नोंदणीनंतर मयत झाले आहेत तर ८ व्यक्ती या परगांवी गेले असल्याने १५३ मतदारापैकी १३१ मतदारांनी मतदान केले आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. आंध्रप्रदेश राज्यातील विशेष पोलीस म्हणून ९६ पोलिसांचा फौज फाटा तहसील कार्यालयावर दाखल झाला आहे. याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त ५०० पोलिसांचा फौज फाटा मागविण्यात आला आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असून गृहरक्षक दलाचे जवानही निवडणुकीच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.
