Top News

खासगी सावकारीतून नागावच्या तरुणास बेदम मारहाण



 हेरले / शिवार न्यूज नेटवर्क :

नागाव,ता.हातकणंगले येथील सागर सुधाकर समुद्रे वय वर्षे - ३७ या युवकास नग्न करून मारहाण करणेत आली. या मारहाण प्रकरणी वैभव माजगावकर, धनाजी गुरव रा. पुलाची शिरोली ता.हातकणंगले व अभिजीत शिंदे,रा.संभाजीनगर, नागाव ता. हातकणंगले यांचे विरोधी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  शिरोली पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,सागर सुधाकर समुद्रे हा नागाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. दोन महिण्यापूर्वी त्यांने आजारी असलेने दवाखाण्यासाठी पाच हजार रुपये वैभव माजगावकर याचेकडून व्याजाने घेतले होते. त्यावेळी सागरने कोरा चेक वैभवकडे दिला होता. या प्रकरणात अभिजित शिंदे हा मध्यस्थी होता. वैभवने सागर व अभिजितकडे पैशासाठी तगादा लावला होता. त्यामुळे बुधवारी ८ मे रोजी अभिजितने सागर यास नागाव फाटा येथे बोलावून घेतले. त्यानंतर अभिजितने सागरला वैभव सावंत व धनाजी गुरव हे शिरोली परिसरातील एका बियर बार मध्ये घेऊन गेला.त्या बारमध्ये सर्वानी मिळून मद्य प्राशन केले.त्यावेळी पैशाचा विषय निघाला असता सागरने त्यांना पाच हजार रुपये दिले.उर्वरित व्याजाची रक्कम थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले. पण वैभव ,धनाजी व अभिजित ने उर्वरित पैसे आताच्या आत्ता पाहिजेत. असा आग्रह धरला पण पैसे मिळत नाही म्हणून सागर यास नग्न करून बेदम मारहाण केली. थोडयावेळाने सागरच्या पत्नीचा फोन आला. तिलाही यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. व सागरने पैसे नाही दिले तर तू फेडायचे,नाहीतर तुझे घर माझ्या नावावर करून दिले पाहिजे. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुम्हाला सोडणार नाही.माझी पोलीस स्टेशन तसेच सगळीकडे ओळख आहे,त्यामुळे मला कोण काय करू शकत नाही अशी धमकी दिली. त्यामुळे दहशती पोटी सागरने तक्रार देण्याचे धाडस केले नाही.अखेर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला विश्वासात घेऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हि घटना घडून तीन दिवस झाले तरी आरोपी अध्याप फरारी आहेत.घटना घडल्यानंतर आरोपी वारंवार सागरची पत्नी योगिता यांना फोन करून केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी. अशी मागणी सागरच्या पत्नीने केली आहे. या तिन्ही आरोपींवर महाराष्ट सावकारी (निगमन)अधिनियम,२०१४ नुसार कलम ३९,४५ तसेच भारतीय दंड संहिता ३२४,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी हे करत आहेत.


थोडे नवीन जरा जुने