Top News

शिरोळ ते पंढरपूर चैत्र वारी पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

     बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री राम कृष्ण हरी, श्री विठ्ठल विठ्ठल.. जय हरी विठ्ठलचा अखंड जयघोष करीत टाळ मृदुगाच्या गजरात शिरोळ नगरीतुन चैत्र वारीसाठी तिर्थक्षेत्र पंढरपुरला वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी शिरोळकरांनी दिंडी मार्गावर सडा रांगोळी घालून व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. पंढरपूर येथील चैत्र वारीच्या निमित्ताने गेल्या 10 वर्षापासून शिरोळ येथील गुरूप्रसाद इंडस्ट्रीजचे प्रमुख व उद्योगपती ह भ प हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे व इंगळे कुटूंबियांनी स्वखर्चातून वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली आहे. यावर्षी सुध्दा या दिंडीसाठी शिरोळ परिसरातील 250 वारकरी सहभगी झाले आहेत.

आज शुक्रवारी सकाळी 9 वाजता  दादासाहेब इंगळे यांच्या निवासस्थानी न्यायशास्त्री राजराम महाराज यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विणा पूजन, पालखी पूजन व आरती होवून या दिंडीचे उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. यावेळी येथील श्री हनुमान मंदिर गावडे गल्ली, श्री ब्रह्म मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, चौकातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, श्री विठ्ठल मंदिर येथे आरती होवून ही पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.पायी दिंडी प्रस्थान समयी शहरातील नागरिकांनी रस्त्यावर सडा मारून,रांगोळी काढून पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले. मनोभावी पालखीचे पूजन करून या दिंडीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी नगरसेवक पंडित काळे बाळासाहेब कोळी यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर,प्रतिष्ठित नागरिक यांनी पायी दिंडीला शुभेच्छा दिल्या. या पायी दिंडी सोहळ्याचे उद्योगपती ह भ प हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, सुनिल इंगळे, अनिल इंगळे, गुरूप्रसाद इंगळे,दिगंबर इंगळे व इंगळे परिवारातील सदस्यांनी उत्कृष्ट आणि नेटके नियोजन केले आहे. तर किरण माने, सर्जेराव माने, विलासराव गावडे, शंकर गावडे, भरत रोडे, तानाजी माने, संग्राम माने,उदय जगदाळे,बाळासाहेब जगदाळे यांचे वारकरी दिंडी सोहळ्यास विशेष सहकार्य लाभत आहे. अखंड हरिनामाचा जयघोष करीत भक्तिमय व उत्साही वातावरणात वारकऱ्यांची ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली.

थोडे नवीन जरा जुने