न्यू यंग स्टार मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविलेल्या बहूजन ग्रामविकास आघाडीच्या लोकनियुक्त सरपंच रेखा जाधव व नुतन सदस्यांचा न्यू यंग स्टार मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, महिला ग्रामपंचायत सदस्यांचा विधवा महिलांच्या हस्ते सत्कार करुन एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
प्रारंभी स्वागत बंडू बरगाले यांनी केले. यावेळी बोलताना प्रथमेश पाटील म्हणाले, हेरवाडच्या जनतेने बहूजन विकास आघाडीवर विश्वास ठेवून आमच्या सर्व शिलेदारांना सेवा करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करून गांवच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करु. या पुढील काळात जनतेच्या सर्व समस्या मार्गी लावून आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेवर भर देवून नुतन पदाधिकारी काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना अर्जुन जाधव म्हणाले , पोलिस पाटील पदाचा त्याग करून गांवच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आणि बघता बघता आम्हाला जनतेने डोक्यावर घेतले व भरघोस मतांनी निवडून दिले. तसेच सर्व सदस्यांनाही भरघोस मते मिळाली, जनतेने हा दाखविलेला विश्वास विकास कामांच्या माध्यमातून सार्थ करु, हा बदल जनहिताचा बदल आहे. त्यामुळे नक्कीच गांवच्या विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच विधवा महिलांसाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले. यावेळी नुतन लोकनियुक्त सरपंच रेखा जाधव म्हणाल्या, गांवच्या लोकांनी एवढया मताधिक्यांनी आम्हाला निवडून दिले, याचा विश्वास मनी बाळगून तेवढ्याच ताकदीने विकास कामे करू आणि गांवचा विकास साधू, असे सांगितले.
यावेळी नुतन सदस्य हयाचांद जमादार, सचिन पाटील, भरत पवार, छाया सुर्यवंशी, माजी सरपंच चंद्रकला पाटील यांची मनोगते झाली. यावेळी नुतन पदाधिकार्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गटनेते दिलीप पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव माळी, सुनिल माळी, बंडू पाटील, पायगोंडा आलासे, दिलीप माळी, प्रमोद माळी, संतोष पुजारी, संजय नेर्ले, कुमार सौदे यांच्यासह न्यू यंग स्टार मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार धनंजय सौदे यांनी मानले.
