हेरवाडच्या लोकप्रतिनिधींचे बांधकाम विभागाला निवेदन
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड गावातून जाणाऱ्या व सध्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या 153 केंद्रीय मार्ग म्हणजे सलगरे ते पाचवा मैल मार्गात हेरवाड गावची पाणी पुरवठा पाईप लाईन रस्त्याच्या मध्ये आली असल्याने भविष्यात लिकेजची समस्या उद्भवू नये, यासाठी पाईप लाईन रस्त्याच्या कडेला घेण्यात यावी व त्यांनंतर रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, या आशयाचे निवेदन अर्जुन जाधव व त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या सलगरे ते हेरवाड या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या रस्त्याखाली हेरवाड गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे. त्यामुळे भविष्यात लिकेज झाल्यास सदरचा लिकेज काढणे अवघड होणार आहे, आणि पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे सदरची पाईपलाईन रस्त्याच्या कडेला घेण्यात यावी व त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान निवेदनाची दखल घेऊन यासंबंधी उद्या तात्काळ मीटिंग बोलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, नुतन ग्रामपंचायत सदस्य भरत पवार, अफसर मकानदार आदी उपस्थित होते.
