सांगली / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्यार्थ्यांनी सध्याचा कल पाहून खेळाबरोबर अभ्यासाला महत्त्व द्यावे. सदैव संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते अशा प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या यशाचा आनंद खूप मोठा असतो. त्यामुळे मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा असे प्रतिपादन थोरात अकॅडमी चे माजी विद्यार्थी, सांगलीचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मयूर जगदाळे यांनी केले
येथील लेफ्टनंट जनरल एस. पी पी थोरात शांतिनिकेतन च्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विक्रीकर निरीक्षक म्हणून नुकतेच निवड झालेले, अकॅडमी चे माजी विद्यार्थी अजिंक्य शिंदे, सागर जमदाडे, इन्चार्ज समीता पाटील, उपसंचालक धनंजय माने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जगदाळे म्हणाले की, शांतिनिकेतन चा परिसर हा समृद्ध आहे.बौद्धिक गुणवत्ता व शारीरिक मेहनत अतिशय महत्त्वाची असून यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन करून काटेकोरपणे अंमलबजावणी करा.
अकॅडमीचे माजी विद्यार्थी,स्पर्धा परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झालेले सागर जमदाडे व अजिंक्य शिंदे यांनी थोरात अकॅडमी परिसरातील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शालेय जीवनात सामान्य ज्ञान वाढवावे आपले ध्येय निश्चित करून अभ्यास करावा असा मौलिक सल्ला दिला.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चित्रकला, हस्ताक्षर, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, विद्यार्थी-शिक्षक ऑर्केस्ट्रा, अंताक्षरी, कथाकथन तसेच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या इन्चार्ज समिता पाटील यांनी तर अतिथी ओळख मोहन कोळेकर यांनी केले.तसेच सूत्रसंचालन निवृत्ती पाटील तर आभार उज्वला शिंदे यांनी केले. यावेळी शिक्षक, सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनीमोठ्या संख्येने उपस्थित होते.
