Top News

शिरोळ तालुक्यातील १७ गावांत ८४.५२ टक्के चुरशीने मतदान

शिरोळ / प्रतिनिधी

राजकीय नेत्यासह स्थानिक कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा ठरलेल्या शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. शिरोळमधील १७ गावांत एकूण ८४.५२ टक्के मतदान झाले. यामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. नव्या युवक -युवती मतदारानी प्रथमच मतदान करून लोकशाही निवडणुकीचा आनंद घेतला .

      दरम्यान, राजापूरवाडी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित १६ सरपंच पदाच्या जागांसाठी एकूण ४७ तर सदस्य पदाच्या १८७ जागांकरिता ४५१ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी मतदान यंत्रात बंद झाले, या निवडणुकीत परस्पर विरोधी गटाने विजयी होणारच असा दावा केला आहे.

     रविवारी सकाळपासून मतदारांनी चुरशीने मतदान केले, यामध्ये विशेषतः महिला शेतमजूर यांनी मतदानाचा हक्क बजावला, परगावी असणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी दोन्ही आघाडीतील स्थानिक नेत्यांनी खाजगी वाहनांचे नियोजन केले होते, शिरोळ तालुक्यात 66 हजार 278 मतदारांपैकी 55 हजार 687 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 32 हजार 455 महिला मतदारांपैकी 26 हजार ७३६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 33 हजार 823 पुरुष मतदारांपैकी 28 हजार 951 मतदारांनी मतदान हक्क बजावला, सर्वाधिक मतदान लाटवाडी ग्रामपंचायतीमध्ये ९४.०४. टक्के मतदान झाले आहे तर राजापूरवाडी मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 65.13 टक्के मतदान झाले आहे.

     तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीकरिता ७५ प्रभागांमध्ये १०३ मतदान केंद्रावर ६१८ कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम पाहिले, तहसील कार्यालयाच्या निवडणूक कक्षातून रात्री उशिरा गावनिहाय मतदान टक्केवारी प्राप्त झाली,

       गावनिहाय ग्रामपंचायत व झालेल्या मतदानाची कंसात टक्केवारी अशी : - 

अब्दुललाट ( ८०.५३ ), टाकवडे ( ८४.६१ ), अकिवाट ( ८४.८५ ), उमळवाड (८९.३४ ), शिवनाकवाडी ( ८९.७९), खिद्रापूर (८५.४६ ), औरवाड ( ८५.४२ ), कवठेसार ( ८७.५९), नवे दानवाड ( ८३..०८ ), लाटवाडी ( ९४.०४), हेरवाड ( ८८.८२ ), हरोली (९०.०३ ), राजापूर ( ८७.५१ ), संभाजीपूर ( ७०.८६), चिंचवाड ( ८१.५२ ), कनवाड ( ८९.२९ ), राजापूरवाडी ( ६५.१३ ) 

थोडे नवीन जरा जुने