Top News

ग्रामस्थांनी रेखा जाधव यांची उमेदवारी घेतली मनावर

 लोकवर्गणीतून निवडणूक लढविण्यासाठी दिली दीड लाखाची देणगी

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यात कायम चर्चेत राहिलेल्या हेरवाड गावाने या निवडणूकीतही आपलीच चर्चा कायम ठेवली आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढवित असलेल्या रेखा जाधव यांना गावातील स्वाभिमानी परिवार, बंडू पाटील, देवा ग्रुप, सुनिल वग्गे, जल्लोष ग्रुप, संत रोहिदास मंडळ व अभिजीत माने यांच्याकडून तब्बल दीड लाखाचा निधी निवडणूक लढविण्याकरीता देण्यात आल्याने, ही निवडणूक आता ग्रामस्थांनीच मनावर घेतली असल्याचे दिसून येत आहे.

दिलीप पाटील व वसंतराव देसाई यांच्या माध्यमातून बहुजन ग्रामविकास आघाडीची प्रचार यंत्रणा जोरात सुरु आहे. गावातील प्रत्येक प्रभागात या आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सरपंच पदासाठी रेखा जाधव तर सदस्य पदासाठी स्वच्छ, प्रामाणिक आणि नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आल्यामुळे या आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचाच भाग म्हणून प्रचार शुभारंभादिवशी स्वाभिमानी परिवाराकडून 30 हजार तर स्वाभिमानीचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी 21 हजाराची देणगी दिली. तसेच देवा ग्रुप, सुनिल वग्गे व जल्लोष ग्रुपच्या वतीने 51 हजाराची देणगी नुकतीच देण्यात आली. याचबरोबर संत रोहिदास तरुण मंडळ व अभिजित माने यांच्याकडूनही 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक ग्रामस्थांनी मनावर घेतली असून आमचे पॅनेल निश्‍चित विजयी ठरेल, असे मत पॅनेल प्रमुख दिलीप पाटील व वसंतराव देसाई यांनी व्यक्त केले आहे.



थोडे नवीन जरा जुने