औरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी, वार्डनिहाय मतदारांची व्यूहरचना, आपला कोण, परका कोण आणि कोणत्या गटातून कोण लढत देणार या सर्व विषयांवर औरवाड ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर औरवाड येथील फाट्यावरील हॉटेलमध्ये आणि गावातील चौकामध्ये चाय पे चर्चा रंगत आहे.
गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंचपदाकडे बघितले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच इच्छुक उमेदवार आतापासूनच फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. यासाठी आडाखे आखले जात आहेत. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा गावात रंगत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
वॉर्डनिहाय मतदार याद्या ,स्थलांतरित मतदार, नातेवाईक, मित्रमंडळी, निवडून येण्यासाठी किती मते आवश्यक आहेत अशा बारीकसारीक बाबींचा सखोल अभ्यास आतापासूनच दिग्गज करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
