अतिक पटेल / शिवार न्यूज नेटवर्क :
औरवाड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला आतापासूनच वेग आला असून, उमेदवार निश्चित करण्याचे काम गावातील राजकीय पुढाऱ्यांकडून सुरू आहे. ही निवडणूक व सरपंचपद प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने यावेळी दिग्गजांच्या लढती रंगण्याची चिन्हे आहेत.
गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंचपदाकडे बघितले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच इच्छुक उमेदवार आतापासूनच फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. यासाठी आडाखे आखले जात आहेत. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा गावात रंगत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
वॉर्डनिहाय मतदार याद्या ,स्थलांतरित मतदार, नातेवाईक, मित्रमंडळी, निवडून येण्यासाठी किती मते आवश्यक आहेत अशा बारीकसारीक बाबींचा सखोल अभ्यास आतापासूनच दिग्गज करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
