दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांचे पाठबळ : पहिल्याच वर्षी बिया उत्पादन तिप्पट
सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
जनतेचे आरोग्य निरोगी व सशक्त राहण्यासाठी तसेच भावी पिढीला आरोग्यदायी जीवन मिळावे यासाठी शेडशाळ (ता शिरोळ) येथील 130 महिलांनी एकत्र येऊन देशी वाणाच्या बियांची (बीजबँक) तयार केली आहे, स्व आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील महिला फाउंडेशन बीज बँक शिरोळ या नावाने ही बँक आकारला येत आहे, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी महिलांनी निर्माण केलेल्या देशी वाण बँक चळवळीला बळ दिले असून महिलांनी सुरू केलेल्या अभिनव कृषी चळवळीचे तालुक्यात कौतुक होत आहे.
दरम्यान, अत्यंत परिश्रम घेऊन महिलांनी पहिल्याच वर्षी अल्पशा उपलब्ध देशी बिया संकलित करून देशी बियांची लागवड यशस्वी केली आहे , त्यांनी दुसऱ्या वर्षी देशी बियाणे तिप्पट प्रमाणात उपलब्ध केले असून या दुर्मिळ देशी बियांची नोंद बीज बँकेत ठेवण्यात आली आहे, यावर्षीही सर्वाधिक हे बीज उत्पादन घेण्याचा संकल्प महिलानी केला आहे.
शिरोळ तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती तसेच प्रदूषण वातावरणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी तसेच चांगले व सदृढ आरोग्यासाठी विषमुक्त अन्न असा संकल्प करून सेंद्रिय व जैविक शेती तसेच देशी वाणाचा उपयोग करणे गरजेचे आहे, हे ओळखून दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील यांनी देशी वाण बीजबँक स्थापन करण्याचा संकल्प केला, त्यानुसार शेडशाळ येथील गोकुळ महिला बचत गटाच्या महिलांनी अगदी तळमळीने देशी बँक स्थापन करून बीज उत्पादनासाठी मोठी चळवळ उभी केली आहे,
दत्त कारखाना चेअरमन पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई यांच्या कर्तबगारीचे उदाहरण देऊन महिलांना देशी बियांच्या बीजबँक निर्मिती बाबत मार्गदर्शन केले, शेडशाळ येथील शेतकरी समूह संस्थेचे सचिव व दत्त चे संचालक निजामासो उर्फ भैय्या पाटील यांच्या प्रयत्नामुळे महिला एकत्रित आल्या, अखेर राहीबाई यांच्याशी संपर्क साधून देशी वाण बियाणे संदर्भात मार्गदर्शन घेऊन ही बँक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याप्रमाणे महिलाही त्यांच्या भेटीसाठी आतुर होत्या, मात्र कोरोना काळात राहीबाई यांनी भेट नाकारली, मात्र दरम्यान दत्तचे चेअरमन पाटील यांनी वाळवा ,सातारा, इस्लामपूर ,नगर या भागात देशी बिया मिळतात का ? याची चाचणी सुरू केली होती, अखेर सातारा ,वाळवा येथे देशी बिया मिळाल्या, त्याशिवाय दत्त कारखान्याने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्याकडून देशी बिया कुरिअरने मागून घेतल्या, त्यानंतर दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर शेडशाळमधील महिलांची बैठक घेऊन संघटित 130 महिलांना बियांचे वाटप करण्यात आले, त्यानंतर देशी वाण बिया लागवडीस प्रारंभ झाला.
दुसऱ्या दिवसापासून सर्व महिलांनी बिया घेऊन आपल्या परसबागेमध्ये बिया घातल्या, यामध्ये 42 प्रकारचे बी होते, गोकुळ महिला बचत गटांनी सामूहिक रित्या ३ गुंठा प्लॉट घेऊन शासनाच्या स्ट्रक्चर पद्धतीने 19 प्रकारचे बी घातले, यासाठी रूपाली सुरेश मेंगे यांनी स्वतःच्या मालकीचा तीन गुंठ्याचा प्लॉट दिला, या बियाणे प्लॉटसाठी गुरुप्रसाद कोरवी यांनी पाण्याची व्यवस्था केली, अनेक कृषी अभ्यासक तसेच तज्ञांनी भेटी देऊन महिलांच्या कार्याविषयी प्रोत्साहन देत कौतुक केले, दत्त कारखान्याचे ए एस पाटील वैदेही मॅडम यांनी वरचेवर भेटी देऊन मार्गदर्शन केले, त्यामुळे बियांचे उत्पन्नही चांगले मिळाले, दरम्यानच्या कालावधीत बीजमाता राहीबाई पोपरे यांनी दत्त कारखाना भेट देऊन महिलांनी निर्माण केलेल्या बीज बँकेच्या प्रयोगशील कामाचे त्यांनी कौतुक केले.
