हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
शिरोळ तालुक्यात काल शुक्रवार दि.21 ऑक्टोबर 2022 रोजीच्या रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजला.हेरवाड-घोसरवाड मार्गावर आज सकाळी मोटारसायकलस्वार वाहून जाता जाता केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचला.
शिरोळ तालुक्यातील अनेक मार्गावर पाणी आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. प्रामुख्याने सांगली -कोल्हापूर बायपास महामार्ग,हेरवाड-घोसरवाड, चिंचवाड- शिरोळ,अकिवाट -मजरेवाडी,शिरोळ -शिरटी या प्रमुख मार्गावर पावसाचे पाणी आले होते.
दत्तनगर परिसरातील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. हेरवाडमध्ये आलगोंडा पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.शिरढोणमध्ये गोठ्याची भिंत कोसळली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. सैनिक टाकळीत शेतीला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.अनेकांच्या घराभोवती पाणी साचल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त झाले.
दरम्यान शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अवकाळीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत कोविड-19च्या आपतीमुळे गेली 2 वर्षे दिवाळीचा उत्सवावर विरजन पडल्याने या वर्षी दिवाळी सणासाठी व्यापारी,सामान्य नागरिक,कामगार,महिला वर्गामध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण होते. मात्र अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.लावण केलेला ऊस,कापणीस आलेले पीक कुजल्याने,शेतातील माती वाहून गेल्याने यावर विरजन पडले. या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने "ओला दुष्काळ " जाहीर करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
