राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
चिंचवाड, ता. शिरोळ येथे रविवार दि. 8 मे रोजी दक्षिण भारतातील पहिलेच जैन युवा संमेलन होत आहे. श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर चिंचवाड व जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन होत आहे. तरी सर्व जैन युवक - युवती व श्रावक -श्राविका या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
दक्षिण भारतातील पहिलेच युवा संमेलन चिंचवाड येथे होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून जैन धर्म पंत मुक्त करणे, जैन प्राचीन परंपराचे संरक्षण करणे, युवक-युवती सक्षमीकरण करणे, व्यसनमुक्ती, शाकाहारी सदाचारी युवक घडवणे यासह विविध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून चिंचवाड येथे 8 मे रोजी दुपारी २ वाजता जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली जैन युवा संमेलन होत आहे. संमेलनाचे उद्घाटन सौ. स्वरूपाताई पाटील - यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून सौ. अर्चनाताई मगदूम-गाट या 'युवक-युवती संक्षमीकरण' या विषयावर तर प्रा.डॉ. सुरज मडके हे 'गौरवशाली इतिहासातून उज्वल भविष्याकडे' विषयावर व राजकुमार चौगुले हे 'व्यसनमुक्ती काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी वीर सेवा दल अध्यक्ष शशिकांत राजोबा, सन्मती संस्कार मंच अध्यक्ष सुरेश चौगुले, दक्षिण भारत जैन सभेचे कर्नाटक राज्य महामंत्री बाळासाहेब पाटील, वीर महिला मंडळ अध्यक्ष विजयाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनाला कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक सीमा भागातील जैन श्रावक - श्राविका उपस्थित राहणार आहेत.
