कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विश्व मराठी परिषदेने ७ आणि ८ मे, २०२२ दरम्यान पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन त्यांच्या जन्मगावी कुरूंदवाड येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सैनिकी शाळेच्या परिसरामध्ये केले आहे, अशी घोषणा विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केली. यावेळी जागतिक किर्तीचे सितार वादक आणि द टेंपल ऑफ फाईन आर्टसचे डीन उस्ताद उस्मान खॉं, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे नातू वसंतराव पलुस्कर, प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, शिक्षण प्रसारक मंडळी कुरूंदवाडचे चेअरमन प्रा. शरद पराडकर, कीर्तनकार आणि नाट्यसंगीत अभिनेते चारूदत्तबुवा आफळे, प्रा. अनिकेत पाटील, प्रा. कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होते. महोत्सवासाठी सर्व रसिक श्रोत्यांना नि:शुल्क प्रवेश असून बाहेरगावाहून येणाऱ्या रसिकांसाठी निःशुल्क निवासाची व्यवस्थादेखील उपलब्ध आहे.
या महोत्सवामध्ये जगप्रसिद्ध सितार वादक उस्ताद उस्मान खाँ, विदुषी मंगलाताई जोशी, सौ. रेवा नातू, पं. संजय गरुड, पं. विनोद डिग्रजकर, सुखदा काणे, चारुदत्त आफळे, सौ. आलापिनी जोशी, श्री. गिरीश कुलकर्णी असे अनेक सन्माननीय कलाकार सहभागी होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूवर्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे नातू आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्करांचे चिरंजीव श्री. वसंतराव पलुस्कर हे या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाची सर्व माहिती मिळवण्यासाठी तसेच निवास व्यवस्थेच्या नोंदणीसाठी www.pvdpaluskar.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक कलाकार आणि रसिक श्रोत्यांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी ९६७३९९८६०० आणि ९३०९५४५६८७ या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संचालक अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.
