Top News

चिपरी येथे आजपासून हजरत पीर शेखसाहेब उरुसास प्रारंभ

 


अजय सदामते / शिवार न्यूज नेटवर्क :

चिपरी ता. शिरोळ येथील हजरत पीर शेखसाहेब उरूस आज गुरुवार दि ५ मे पासून प्रारंभ होत आहे. हा उरुस दि. ५. ६ व ८ या तीन दिवशी साजरा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना, महापूर या संकटाच्या पार्श्वभूमीवर चिपरी ग्रामस्थांना उरुसाचे आयोजन करता आले नाही. यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे हा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय प्रतिष्ठीत नागरिकांनी घेतला.  त्यासाठी उरुस कमिटी स्थापन करण्यात आली. या उरुसानिमित्त धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि. ५ मे रोजी गंधरात्र आणि रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमात कव्वालीचा मुकाबला होणार आहे. हा कव्वालीचा मुकाबला फरदीन सुलताना (कोल्हापूर) व मोहसिन होणार आहे. चिश्ती (बेळगाव) यांच्यात होणार आहे. हजरत पीर शेखसाहेब दर्गाह येथे हा कव्वालीचा मुकाबला होणार आहे. शुक्रवार दि. ६ मे रोजी उरुसाचा नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमात सिनेस्टार रेखा पाटील यांचा  मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. ८ मे रोजी रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा म्युझिकल धमाका यांचा कार्यक्रम होणार आहे. उरुस कमिटीच्या अध्यक्षपदी पिंटु वेल्डर (कांबळे), उपाध्यक्षपदी राजू पांडव,  खजिनदार पदी नबीलाल नदाफ यांची तर कमिटीमध्ये  तलत मुजावर, श्रीकांत पोवार, शीतल पाटील, धनपाल कनवाडे, सिंकदर अत्तार, मिरासो मुजावर, राजु कोळी, विश्वजित पाटील, धनंजय कांबळे, भरत कांबळे, निहाल मुजावर, मंझील अत्तार, अमोल कांबळे, मनोज राजगिरे, अमोल मरळे, चंद्रकांत कांबळे यांची निवड करण्यात आली.  गेल्या दोन वर्षापासून चिपरी गावामध्ये कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम झाले नसल्यामुळे विशेषकरून महिला वर्गासाठी हे मनोरंजनाचे कार्यक्रम खास आकर्षणाचे ठरणार आहेत. हे सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात यावेत असे आवाहन उरुस कमिटीचे अध्यक्ष, सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने