हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील प्रगतशिल शेतकरी सुनिल देबाजे यांच्या एचएफ जातीच्या गाईला चक्क जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली असता दोन्ही वासरे ठणठणीत असल्याचे सांगितले. या परिसरात गायीला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे.
सुनिल देबाजे यांची वडिलोपार्जित शेती असून ते शेतीला जोडव्यवसाय म्हणून गोपालन करीत दुधाचा व्यवसाय करीत आहेत. शेतातच गायी व बैलांसाठी मुक्त गोठाही त्यांनी बांधला आहे. त्यांनी सन २०२० साली बेंगलोरहून एचएफ जातीच्या गायी आणल्या होत्या. त्यातील एका गाईने नुकताच एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरे वेगवेगळ्या रंगांची आहेत. दोंन्ही वासरे व गाय सुदृढ व सुखरुप आहेत. एकाचवेळी दोन वासरे जन्माला येणे ही लाखातील एखादी घटना असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पट्टेकरी यांनी दिली. सकस आहार, योग्य निगा आणि वेळेवर औषधोपचार या त्रिसूत्रीचा वापर करून केलेले संगोपन आणि तज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली गाईची गर्भावस्थेतील विशेष काळजी यामुळे ही गाय व दोनही वासरे ठणठणीत असून, ती दररोज २८ ते ३० लिटर दूध देते आहे. साधारणपणे 5 टक्के गायीमध्ये जुळे होण्याची शक्यता असते. गुणसूत्रांमधील बदल व अनुवंशिकता या घटकांचा यावर परिणाम होतो. अशा गायी या आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरतात, असे शेतकरी सुनिल देबाजे यांनी सांगितले.