माघारीसाठी अनेक बैठका ; आज माघारीचा शेवटचा दिवस
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या येथील हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला १२ जागेसाठी सध्या ३० उमेदवार राहिले आहेत. आज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने आजच्या दिवसावरच निवडणूकीचा फैसला होणार आहे. त्यामुळे आज दिवसभर होणार्या हालचालीकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्यात ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामधील रामा अकिवाटे यांनी अर्ज माघार घेतल्याने दत्ता बरगाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर छाननीतून राजगोंडा पाटील यांचा दुसरा अर्ज उडल्याने १२ जागेसाठी ३० अर्ज दाखल आहेत.
अर्ज माघारीसाठी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च हा कालावधी असणार आहे. अर्ज माघारीनंतर ९ मार्च रोजी चिन्हांचे वाटप व २० रोजी मतदान होणार आहे. दरम्यान अनेक वर्षापासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र १२ जागांसाठी ३० अर्ज राहिले आहेत. आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अनेक बैठका फिस्कटल्या ?
गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या या संस्थेच्या निवडणूकीसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाकडून उमेदवारी अर्ज माघारीसाठी अनेक बैठका घेण्यात आल्या, मात्र यातील एकही बैठक सफल झाली नसल्याचे समजते. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी विरोधक अर्ज माघार घेणार की निवडणूक लढविणार, हे आजच्या सुर्यास्तानंतरच समाजणार आहे.