सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली माहिती
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्याचा २०२२-२०२३ साठीचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी शुक्रवारी विधिमंडळात सादर केला,
या अर्थसंकल्पात शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शिरोळ तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गासाठी २८ कोटी ६२ लाख रुपये तर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आंतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांसाठी ११ कोटी ४० चाळीस लाख रुपये असा शिरोळ तालुक्यातील या सर्व रस्त्यांसाठी जवळपास ४० कोटी रुपयांच्या भरीव निधी प्राप्त झाल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे, रस्ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या निधीमुळे शिरोळ तालुक्यातील रस्ते मजबूत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले,
राज्याचा शुक्रवारी जाहीर झालेला अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सामान्य माणसाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून सादर केला असल्याने तो सर्वसमावेशक आहे असे सांगताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या सर्वच क्षेत्रातील घटकांना दिलासा देणारा त्याचबरोबर शेती, शेतीपूरक व्यवसाय, व उद्योग व्यवसायांना चालना देणारा असल्याचे राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी म्हटले आहे.
शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचे आभार व्यक्त केले आहे.