संस्थेमधील भयभीत झालेल्या वृद्ध मंडळीना आधार देत मनोबल वाढण्याचा प्रयत्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
निमशिरगाव (ता शिरोळ) येथे सुरु असलेल्या आई वृद्धाश्रम इमारत बांधकामाला दिरंगाई होत असल्याने तातडीचा शेड निवारासाठी आई वृद्धाश्रम संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि वृद्धाश्रमाचे आश्रयदाते संकटाला धाऊन आले, त्यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून रक्कम व साहित्य रूपाने मदत केली, खंबीरपणे पाठीशी उभे राहून मदतीचा हात देणा-या विश्वस्त मंडळाच्या सहकाऱ्यांच्या मदतीतून आई वृद्धाश्रम संस्थेच्या स्वतःच्या जागेत निवारा शेड उभे राहिले आहे.
जयसिंगपूर येथे सध्या भाड्याच्या इमारतीमधील आई वृद्धाश्रम संस्थेमधील वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने व त्यांच्या मनात भितीदायक वातावरण निर्माण झालेने संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी निमशिरगाव येथील वृद्धाश्रमाच्या स्वतःच्या जागेत शेड मारून राहण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांच्याकडुन प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वृद्धाश्रम शेड निवारा मदतीचे काम सुरू झाले असून या मदतीतुन आई वृद्धाश्रमाचे स्वतः चे शेड उभे राहिले आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात आई वृद्धाश्रम संस्था स्वतःच्या जागेत निमशिरगाव येथे स्थलांतर होत आहे,
या मदतीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले म्हणाले, आई वृद्धाश्रम संस्थेमधील विश्वस्त मंडळाच्या मदतीतून आई वृद्धाश्रमाचे शेड उभे राहत असून ही मदत लाख मोलाची आहे. अनाथ, निराधार वृध्दांच्या दु:खावर फुंकर घालणारी आणि त्यांना चांगले आरोग्य मिळावे याकरिता महत्त्वाची ठरली आहे. मदतीबरोबर मिळालेला आधार कधीही विसरू शकणार नाही. अशा शब्दांत संस्थाप्रमुख भोसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यांनी दिला मदतीचा हात
पत्र्याचे शेड उभे करण्यासाठी जयसिंगपूरचे डॉ प्रसाद माने ( एम. डी . मेडिसीन ) यांच्या कडून 10 हजार रुपये , महादेव हिप्परकर यांच्याकडून - 10 हजार रुपये , डॉ अनिल तकडे यांच्याकडून 3 हजार रुपये, शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व सह्याद्री ॲग्रो संस्थेचे सर्जेराव पुंदे व ज्येष्ठ पत्रकार दगडू माने यांच्याकडून 12 नग सिमेंट पत्रे , संदिप हडपद यांच्याकडून एक हजार रुपये अशी मदत जमा झाली.