Top News

विजांच्या कडकडाटात पावसाची दमदार एन्ट्री

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या काही दिवसांपासून ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमानामुळे अक्षरशः होरपळून निघालेल्या शिरोळ तालुक्यात आज अखेर पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार आगमन केले. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

उन्हाचा प्रचंड तडाखा सहन करत असलेल्या नागरिकांना या पावसाची अत्यंत गरज भासत होती. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे जनजीवन त्रस्त झाले होते. विशेषतः दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत होते, तर शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत होते. अशा परिस्थितीत आज पडलेल्या पावसामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या, तर वाऱ्यामुळे धुळीचे लोटही उडाले. मात्र, या सगळ्यांनंतरही नागरिकांनी पावसाचे स्वागतच केले.

या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा पाऊस महत्त्वाचा ठरत असून आगामी हंगामासाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हवामानात झालेल्या या बदलामुळे पुढील काही दिवसांतही अधूनमधून पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या शिरोळकरांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

थोडे नवीन जरा जुने