शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शिखराला दोन ठिकाणी म तडे गेले आहेत. इलेक्ट्रिक साहित्यासह भगवा पताका जळाला आहे. . शहराच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर वीज पडल्याने सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. सुदैवाने पांडुरंगाच्या कृपेने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंदिराच्या आतील बाजूस धैर्यशील देसाई हे आपल्या आई-वडिल व कुटुंबासह राहतात. विजेच्या कडकडाटात विज कोसळल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली .
शिरोळ तालुक्यात गेली चार दिवस प्रचंड उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. रविवारी रात्री आठ वाजता विजेच्या कडकडासह जोरदार पावसाने सुरुवात झाली. शिवाजी चौक, संभाजी चौक, यासह अन्य ठिकाणी पावसात सुरक्षित रहावे याकरिता नागरिक आडोशाला थांबले होते. याचदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर विजेच्या लखलटासह प्रचंड आवाजासह वीज कोसळली. क्षणात या परिसरात प्रचंड घबराट पसरली. अनेकांनी आपापले दुकानाचे शटर बंद करून आश्रय घेतला .
शहरातील हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 1932 साली स्वर्गीय यशवंतराव घारगे देसाई यांनी बांधले आहेत . 1936 साली या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. संपूर्ण मंदीर हे दगडी बांधकामाचे करण्यात आले असून सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. अत्यंत सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. भव्यदिव्य अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असून दररोज शेकडो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात .
मंदिराच्या शिखरावर वीज पडल्यानंतर मंदिराचे प्रमुख यशवंत उर्फ बंटी देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रविवारी रात्री आठच्या सुमारास प्रचंड विजेच्या कडकडासह शिखरावर वीज पडल्याने शिखराचे तडे गेले आहेत. तसेच इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले असून भगवा पताकाही जळाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या मंदिराचे नुकसान किती झाले हे सांगणे कठीण असून नांदेड येथील शिखराचे काम करणाऱ्या तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच शिरोळचे तलाठी यांनी पंचनामा केला आहे. लवकरच शिखर दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष धनाजीराव देसाई, बाबा देसाई, जयसिंग देसाई, राजकुमार देसाई , गुरुदत्त देसाई ,पृथ्वीराज देसाई, यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन पाहणी केली.
