Top News

हेरवाडच्या शेतकऱ्याच्या मुलीच्या हाती मेट्रोची स्टेअरिंग

गावची कन्या रसिका तेरवाडे बनली शिरोळ तालुक्यातील पहिली मेट्रो चालक



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष साध्य करता येते यासाठी मोठा वारसा असल्यास पाहिजे असे नाही, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रसीका संजय तेरवाडे हे नाव कालपर्यंत कुणालाही माहित नसलेल्या या नावाने फक्त स्वतःचंच नाही तर आपल्या कुटुंबाचं आणि गावाचं नाव मोठं केले सामान्य शेतकरी कुटुंबातील या भूमिकन्येने कोणतेही पाठबळ नसताना स्वबळावर मेट्रोच्या पायलट पदापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे मेट्रो चालवणारी शिरोळ तालुक्यातील रसिका ही पहिली मुलगी ठरली आहे.

प्राथमिक ते माध्यमिक पर्यंत रसिका हिचे शिक्षण प्राथमिक आश्रम शाळा तेरवाड या ठिकाणी झाले. त्यानंतर तिने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील चिमासाहेब जगदाळे कॉलेजमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. व शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिग्रीचा अभ्यास सुरू केला. डिग्री पूर्ण करून तिने महावितरण कंपनीत अप्रेंटिस म्हणून प्रमाणपत्र घेतले. हे करीत असताना रेल्वे भरतीचा अभ्यास सुरू ठेवला होता. यातूनच तिची स्टेशन कंट्रोलर म्हणून पुणे मेट्रोमध्ये निवड झाली. एवढ्यावरच न थांबता तिने ट्रेन ऑपरेटर पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट मेट्रो पायलेट म्हणून तिची नुकतीच निवड झाली. हे संपूर्ण यशात तिला तिचे वडील संजय तेरवाडे व आई शारदा तेरवाडे यांचे मोठे मार्गदर्शन लाभले.

तेरवाडे कुटुंब पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करतात. शेतातून मिळणारे उत्पन्न यावरच ते आपला उदरनिर्वाह चालवतात. आपल्या मुलाच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करीत आज तेरवाडे कुटुंबियांची सर्व मुले - मुली उच्च शिक्षण घेत आहेत. रसिका हिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. या प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत तिने उच्च शिक्षण घेऊन आपल्या परिस्थितीला सुधारण्याचा निर्णय घेतला. तेरवाडे कुटुंबीयांची वस्ती मळ्यात असल्याने सुमारे तीन किलोमीटर पायपीट चालत जाऊन तिथून बसच्या माध्यमातून तिने सुमारे ७ वर्षे उच्च शिक्षणाचे ध्येय गाठले. वडील संजय तेरवाडे यांनीही तिला कशाचीही कमतरता न भासू देता उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिले. या सर्व कष्टाची जाणीव रसिकाने राखत थेट भारतीय रेल्वे खात्याच्या उच्च पदापर्यंत कोणत्याही आरक्षणाविना गवसणी घातली.

  शेतकरी कुटुंबात जन्मलेले रसिका हिने स्वतःच्या हाती मेट्रोची स्टेअरिंग घेणारी शिरोळ तालुक्यातील पहिली मुलगी ठरली आहे. तिच्या या याच्याबद्दल हेरवाडसह परिसरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

थोडे नवीन जरा जुने