अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क :
व्याख्याते सोहन तिवडे लिखित 'द एज: लिविंग वेल' या व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकासावर आधारित पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन संजय घोडावत यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी घोडावत विद्यापीठात झाले.यावेळी विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य डॉ.विराट गिरी,डॉ.बिमल तिवडे,प्रा.डिसूझा उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले, की सोहन तिवडे यांनी विविध व्यावसायिक संस्था, संघटना,शैक्षणिक संस्थांमध्ये कौशल्य आधारित कार्यशाळा,शिबिरे घेतली आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावर कर्मचारी विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षित करतात. हे करत असताना त्यांना आलेले अनुभव व वाचनातून आलेले तत्त्वज्ञान या पुस्तकात मांडले आहे.व्यक्तिमत्त्व विकासासाठी व व्यावसायिक वृद्धीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाबद्दल लेखक म्हणून मत मांडताना तिवडे म्हणाले, की अनुभवातून आणि वाचनातून माझ्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. जीवनात स्वतःची तत्वे आचरणात आणताना काही बंधने स्वतःवर घालावी लागतात. एक समृद्ध जीवन जगताना ही तत्वे आपल्याला कशा पद्धतीने फायदेशीर ठरतात हे वाचकांना सांगण्याचा यातून प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे वाचकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील ही अपेक्षा आहे.हे पुस्तक सर्वांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे.
या पुस्तकासाठी संजय घोडावत, लेखक संतोष शर्मा,प्राचार्य डॉ. संजय खोत यांनी मनोगते लिहिली आहेत. पुस्तक लिहिण्यासाठी सातत्याने प्रेरणा देणारे विश्वस्त विनायक भोसले,विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व कुटुंबाचे सोहन यांनी विशेष आभार मानले आहे.
