महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
भारताचे माजी राष्ट्रपती व वृत्तपत्र विक्रेत्यांचे आदर्श डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ आक्टोबर हा जन्मदिवस भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजेंट्स असोसिएशनश व महानगर वृत्तपत्र संघटना वतीने या मागणीचे पत्र कोल्हापुरचे उपजिल्हाधिकारी श्री दत्तात्रय कवितके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळा राज्य संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनाचे पदाधिकारी किरण व्हणगुत्ते, शंकर चेचर, रवि लाड, प्रफुल्ल कोतमिरे, सुरेश ब्रम्हपुरे, अंकुश परब, परशुराम सावंत, रवि खोत, सुनिल साठे, नागेश गायकवाड, यावेळी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना श्री रघुनाथ कांबळे यांनी सांगितले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा भारत सरकार वाचक प्रेरणा दिवस म्हणून संपन्न करते. डॉ. कलाम यांचा पुस्तकांशी घनिष्ठ नाते होते. एक पुस्तक १०० मित्रांच्या बरोबर असते असे त्यांचे विचार आहेत. डॉ. कलाम यांचे वृत्तपत्र व्यवसायाशी ही जवळचे नाते आहे. आपल्या शैक्षणिक आयुष्याच्या काळात वृत्तपत्र वाटप करण्याचे काम डॉ. कलाम यांनी केले आहे. अडचणींवर मात करत देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणारे डॉ. कलाम हे सर्वांचेच आदर्श आहेत. आपल्या शैक्षणिक पाया घट्ट करत असताना त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र विक्रीचे काम करण्याचा आधार घेतला व त्यामुळे त्यांना पुढे शैक्षणिक प्रगती साधता आली. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी डॉ. कलाम हे आमचे आदर्श आहेत. त्यामुळे ऊन पाऊस थंडी याचा विचार न करता रोज नित्यनेमाने वृत्तपत्रे घरपोच करण्याची वाचक सेवा करणाऱ्या आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांचाही एक दिवस असावा व तो दिवस डॉ. कलाम यांच्या जयंती दिवशी साजरा व्हावा अशी वृत्तपत्र विक्रेत्यांची इच्छा आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने ऑक्टोबर २०१८ पासून १५ ऑक्टोबर हा डॉ. कलाम यांचा जन्म दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. आज संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच देशभरातील १५ राज्यांमध्ये १५ ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर डॉ. कलाम यांचा जन्मदिवस अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून जाहीर करावा अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करीत आहोत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनाही याबाबतचे निवेदन दिले असून कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांनाही याबाबतचे निवेदन देणार आहोत. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष सुनिल पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार व सरचिटणीस विकास सूर्यवशी, श्री रघुनाथ कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष रायप्पा बाळीगिरी उपाध्यक्ष नागेश गायकवाड तालुकाध्यक्ष यांच्यासह राज्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्याचे हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत असून जिल्हा तसेच तालुका पातळीवरही प्रशासनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब व सर्व खासदार यांच्या पर्यंत हे निवेदन पोहोचवण्याचे काम राज्य संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
