हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे माळभाग येथील सिध्दार्थनगर येथे रस्त्याचे काम रखडले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे या कामाकरीता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून आणि माजी सभापती सौ.मिनाज जमादार यांच्या प्रयत्नातून सुमारे ५ लाख रूपये मंजूर झाले आहेत. याबाबत रितसर निविदाही मंजूर करण्यात आली आहे. निविदा प्रसिध्द होवून दोन महिने उलटले तरी कामाला अद्याप सुरूवात नाही. त्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरूवात करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थासह माजी सभापती जमादार यांनी दिला आहे.
सदर कामाची निविदा ही दि. २ मार्च रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. निविदा उघड्याची तारीख १० मार्च रोजी होणार्या मासिक सभेत होती. मात्र सदरच्या कामाची निविदा दोन महिने उलटूनही ग्रामपंचायतीने रस्ता कॉक्रीटकरण करण्याचे आदेश दिलेले नाहीत. ही निविदा प्रसिध्द केल्यानंतर जवळजवळ तीन आठवड्यांनी दिलेली समाजमंदिर बांधकामाची निविदा उघडून त्यांचा कार्यारंभ आदेशही देण्यात येवून सदर समाजमंदिरचे बांधकाम सुरू आहे.
सदरच्या रस्ते कामाची लवकर सुरूवात व्हावी याकरीता येथील नागरिकांनी माजी सभापती यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे सौ.जमादार यांनी या सदर्भात ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांना रस्ते कामाबाबत चार ते पाच वेळा विचारणा केली. सदरच्या कामासंदर्भात जिल्हापरिषद समाजकल्याण अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनीदेखील ग्रामपंचायतीला वारंवार सुचना केलेली आहे. त्यामुळे नंतर दिलेली निविदा उघडून यापूर्वीची निविदा उघड न केली नाही.
या संदर्भात सिध्दार्थनगर भागातील नागरिकांनी दोन-तीन दिवसात रस्ता कामास सुरूवात न झाल्यास माजी सभापती सौ.जमादार यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी शिरोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देवून उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
