शैक्षणिक, सामाजिक-राजकीय, वृत्तपत्र अशा विविध क्षेत्रात कमी-जास्त संघर्ष वाट्याला येऊनही आपल्या कार्याचा ठसा उंचावणारे येथील एस.पी.हायस्कूलमधील तंत्र विभागाचे निदेशक, नंदकुमार गुंडाप्पा सुतार हे आपल्या 38 वर्षांच्या सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त...
श्री नंदकुमार सुतार यांचे मूळ गाव वाघुर्डे ता. पन्हाळा असून त्यांचे प्राथमिक शिक्षण वाघुर्डे येथे तर माध्यमिक शिक्षण कळे येथे झाले. घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असल्याने इयत्ता दहावी नंतर पैशाअभावी त्यांचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय वडीलांनी घेतला मात्र 1981 ला थोरले बंधू हिंदुराव सुतार व पुनाळ ता. पन्हाळा येथील त्यांची बहीण रत्नाबाई सुतार व भाऊजी नारायण शंकर सुतार यांनी त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करण्याची तयारी दर्शविल्याने त्यांनी आय.टी.आय कोल्हापूर येथे प्रवेश घेऊन दोन वर्षाचा पॅटर्न मेकर ट्रेड पूर्ण केला.
1 सप्टेंबर 1984 ला येथे त्यांची तासिका तत्त्वावर निदेशक म्हणून निवड झाली. मात्र आर्थिक संकट कमी झाले नव्हते त्यामुळे नोकरी करण्याची त्यांची मानसिकता नव्हती. त्यांच्याबरोबर वायर निदेशक म्हणून येथील दिलीप रामचंद्र बोटे यांची नियुक्ती झाल्यामुळे बोटे यांनी त्यांना नोकरी न सोडण्याचा सल्ला देऊन चार वर्षे आपल्या घरी जेवण व वास्तव्याची सोय केली. त्यानंतरच्या काळात सुभाष भबीरे, शांतगोंड पाटील, अशोक जगताप, माजी मुख्याध्यापक गणपतराव भोसले, राजन भोसले, भरत चिंचवाडे, मेहताब खान, जहिरूद्दीन कागवाडे, बाळू बांगर व हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी फार मोठी मदत केली.
शिक्षकी पेशा करीत असताना त्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला पण त्यांनी त्याची तमा न बाळगता आपले कार्य सुरू ठेवले. अशा कठीण परिस्थितीत त्यांची पत्नी सुवर्णा, मुलगी प्रज्ञा, मुलगा प्रमोद यांनी मोलाची साथ दिली. सेवेत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी तांत्रिक शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष, राज्य कार्यकारणी सदस्य, तालुका उपाध्यक्ष, शिरोळ तालुका माध्यमिक शिक्षण सेवकांच्या पतसंस्थेचे सभापती व कोजिमाशी पतसंस्थेच्या शिरोळ शाखेवर सल्लागार सदस्य म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांनी दैनिक राष्ट्रगीत, केसरी, पुढारी, ललकार, पुण्यनगरी, या दैनिकात वार्ताहर म्हणून काम केले आहे. सध्या ते दैनिक केसरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर श्री. नंदकुमार सुतार सर यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
