१२ जागेसाठी ३० अर्ज ; माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या येथील हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून एकुण १३ जागांसाठी ३२ अर्ज दाखल झाले होते, दरम्यान रामा अकिवाटे यांनी अर्ज माघार घेतल्याने दत्ता बरगाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान छाननीनंतर १२ जागेसाठी सध्या ३० उमेदवार राहिले असून माघारी नंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्यात ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामधील रामा अकिवाटे यांनी अर्ज माघार घेतल्याने दत्ता बरगाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर छाननीतून राजगोंडा पाटील यांचा दुसरा अर्ज उडल्याने १२ जागेसाठी ३० अर्ज आहेत.
अर्ज माघारीसाठी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च हा कालावधी असणार आहे. अर्ज माघारीनंतर ९ मार्च रोजी चिन्हांचे वाटप व २० रोजी मतदान होणार आहे. दरम्यान अनेक वर्षापासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र १२ जागांसाठी ३० अर्ज राहिल्याने संस्थेची निवडणूक लागण्याची शक्यता असली तरी माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
माघारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न
गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या या संस्थेच्या निवडणूकीसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाकडून उमेदवारी अर्ज माघारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी दबावगट तर आश्वासने आणि प्रलोभनांची खैरातही वाटली जात असल्याची चर्चा सध्या गावात सुरु आहे.