Top News

शिरोळच्या श्रीमती रत्नाबाई शेट्टी , फुलाबाई माने यांना ' आदर्शमाता ' पुरस्कार जाहीर

 शिरढोण येथे संवाद साहित्य संमेलनात होणार मान्यवरांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान सोहळा

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषद बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिरोळ येथील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई आण्णा शेट्टी (आऊ ) व ज्येष्ठ पत्रकार डॉ. दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई श्रीपती माने ( शिरोळ ) यांना ' आदर्शमाता पुरस्कार ' जाहीर झाला आहे. रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते शिरढोण येथील श्रीराम कुंज फार्म हाऊस येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

        प्रारंभीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत श्रीमती रत्‍नाबाई शेट्टी यांनी कुटुंबाला भक्कम आधार दिला आहे. शेतकरी चळवळीबरोबर सामान्य जनतेच्या न्यायीक लढ्यासाठी मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना प्रेरणादायी बळ दिले आहे. शेती , शेतकरी व गोरगरिबांसाठी त्याना कळवळा आहे. कौटुंबिक व जिव्हाळ्यातील नातेसंबंध जपत चळवळीतील शेतकरी हा परिवार मानून त्यांनी आभाळमाया दिली आहे.

       श्रीमती फुलाबाई माने यांनी पती कै. श्रीपती माने यांच्यासोबत शेती मशागतीच्या कामाबरोबरच साखर कारखान्याला बैलगाडीने ऊस तोडणी व वाहतुकीचे काम केले आहे. गरिब परिस्थितीत अपार कष्ट घेवून त्यांनी चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने यांच्यासह दोन मुलींना चांगले घडविले आहे. शिरोळ तालुक्यात यापूर्वी झालेल्या राजर्षि शाहू महोत्सव कार्यक्रमासाठी त्यानी स्वतःच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवून लोकप्रबोधन महोत्सवाला प्रेरणा दिली आहे.  

        शिरढोण येथे संवाद साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सरपंच बाबासो हेरवाडे , माजी खासदार राजू शेट्टी, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील , उद्योगपती विनोद घोडावत यांच्यासह साहित्यिक , लेखक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिवसभर सुरू असलेल्या या संमेलनात ग्रंथ दिंडी , पुरस्कार वितरण , व्याख्यान , कथाकथन ,कवी संमेलन असे कार्यक्रम होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विश्वास बालीघाटे व सचिव डॉ. कुमार पाटील यांनी कळविले आहे.

थोडे नवीन जरा जुने